लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पाचोरा शहरातील सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी भैय्या भरत गायकवाड रा. पाचोरा याला १० वर्षे सश्रम कारावास आणि ३५ हजार रूपयांचा दंड जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. श्रीमती एस.एन .माने यांनी ठोठावला आहे.
याबाबत माहिती अशी की, पाचोरा शहरातील एका भागात राहणारी ७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. ७ मार्च २०१८ रोजी दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास आरोपी भैय्या भरत गायकवाड (वय-२२) रा. पाचोरा या तरूणाने पिडीत मुलीला मोबाईलवर गेम खेळायला चल असे बोलून त्याच्या घरात नेले. त्याठिकाणी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा खटला जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. श्रीमती एस.एन.माने यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आला. यात सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षिदार तपासण्यात आले. यात पिडीत मुलगी, तिची आई, तपासी अंमलदार व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. यात भैय्या भरत गायकवाड याला दोषी ठरवून न्या. माने यांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्यांन्वये १० वर्षाची सश्रम कारावास आणि ३५ हजार रूपयांचा एकत्रित दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून पोहेकॉ विजय पाटील यांनी परिश्रम घेतले.