जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अनेक गावातील पोलीस पाटील व कोतवाल पदासाठी रिक्त असलेल्या जांगावर जळगाव शहरातील आठ केंद्रांवर पोलीस पाटील व कोतवाल पदासाठी उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. याचा निकाल अवघ्या साडेसात तासातच जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला असून आता या पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखती घेण्यात येऊन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्या कार्य तत्पर तेचा परिचय यानिमित्ताने करून दिला आहे. असा हा निकाल पहिल्यांदाच देण्यात आला असावा.
जिल्हा निवड समितीमार्फत घेण्यात आलेल्या पोलीस पाटील व कोतवाल पदांसाठीची परीक्षा आज शहरातील ८ केंद्रावर सुरळीत पार पडली. पोलीस पाटील २२८० व कोतवाल पदांसाठी ११३५ उमेदवारांनी परीक्षा दिली. या पदांचा आजच, दि. १३ ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून निकाल जाहीर करण्यात आला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद देखरेखीखाली घेण्यात आलेल्या या परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली होती. पोलीस पाटील या पदाकरीता सकाळी ११ ते १२.३० या वेळेत ८ केंद्रांवर लेखी परिक्षा घेण्यात आली व कोतवाल पदाकरीता दुपारी ३ ते ४ या वेळेत ४ केंद्रांवर लेखी परिक्षा घेण्यात आली.
भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १५ तहसीलदार (कार्यकारी दंडाधिकारी) व ७ उपविभागीय अधिकारी (उपविभागीय दंडाधिकारी) यांना गोपनीय स्थळी पाठवून त्यांना भरती प्रकिया पारदर्शकता राबविण्याकामी सूचना दिल्या. तसेच त्यांच्याकडून मोबाईल व इंटरनेट विरहीत काम करुन घेवून त्याठिकाणी २४ तास कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. गोपनीय स्थळी जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांना देखील प्रवेश करण्यास मनाई होती. दोन्ही पदांच्या परिक्षेची उत्तरपत्रिका स्कॅनिंग करुन १३ ऑगस्ट रोजी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळावर लेखी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.
पोलीस पाटील या पदाकरीता एकूण २४६७ उमेदवारापैकी २२८० उमेदवार परिक्षेसाठी हजर व १८७ उमेदवार गैरहजर होते. व कोतवाल या पदाकरीता एकूण १२७८ उमेदवारापैकी ११३५ उमेदवार परिक्षेसाठी हजर व १४३ उमेदवार गैहजर होते. पोलीस पाटील या पदाच्या मुलाखतीसाठी समिती अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी यांना स्वतंत्रपणे पुढील कार्यवाहीबाबत कळविण्यात येणार आहे. परीक्षा पारदर्शकपणे पार पाडल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी- कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच या परिक्षांसाठी परिक्षा दिलेले उमेदवार यांनीआपला निकाल जळगाव जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्थात https://jalgaon.gov.in/ येथे क्लिक करून पाहू शकतात.