नवी दिल्ली वृत्तसंस्था : सीबीआय आज(मंगळवार) लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ बनवून शेअर केल्याप्रकरणी देशातील 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 76 ठिकाणी छापे टाकत आहे. याप्रकरणी 14 नोव्हेंबर रोजी 83 आरोपींविरुद्ध 23 नामांकित एफआयआर नोंदवण्यात आल्याचे
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी आता सीबीआयने कठोर पावले उचचली आहेत. सीबीआयने विविध ठिकाणी छापेमारी सुुरु केली आहे. आज सकाळपासून मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, ओडिसा, तामिळनाडू, राजस्थान, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेशमध्ये विविध ठिकाणी अनेक लोकांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील 3 मोठ्या शहरांमध्येही छापे टाकण्यात येत आहेत.
सायबर पोर्नोग्राफीची सर्वाधिक प्रकरणे यूपीमध्ये
2020 च्या NCRB डेटानुसार, मुलांविरुद्ध सायबर पोर्नोग्राफीची सर्वाधिक प्रकरणे उत्तर प्रदेशात 161, महाराष्ट्रात 123, कर्नाटक 122 आणि केरळमध्ये 101 नोंदली गेली आहेत. याशिवाय ओडिशामध्ये 71, तामिळनाडूमध्ये 28, आसाममध्ये 21, मध्य प्रदेशात 20, हिमाचल प्रदेशमध्ये 17, हरियाणामध्ये 16, आंध्र प्रदेशमध्ये 15, पंजाबमध्ये 8, राजस्थानमध्ये 6 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी केरळ आणि कर्नाटक वगळता इतर राज्यांमध्ये आज छापे टाकण्यात येत आहेत. याशिवाय आज गुजरात आणि दिल्लीतही सीबीआयचा तपास सुरू आहे.