मुंबई : वृत्तसंस्था
बेळगावातील शाहुनगर मन सून्न करणारी घटना घडली आहे. विजेचा धक्का लागून आजोबा, आजी आणि नातीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील रामदुर्गा तालुक्यातील अरबेंची तांडा भागातील रहिवासी इरप्पा गंगाप्पा लमाणी (५० वर्ष), शांतव्वा इरप्पा लमाणी (४५ वर्ष) आणि अन्नपूर्णा हुन्नाप्पा लमाणी (८ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. आंघोळीसाठी हिटरच्या मदतीने पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होते. अचानक नातीला पहिल्यांदा विजेचा धक्का बसला. नातीला विजेचा धक्का लागल्याचं पाहिल्यानंतर तिला वाचवण्यासाठी गेलेल्या आजी-आजोबांनाही विजेचा धक्का बसला आणि तिघांचाही जागीच मृत्यू झाला. एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.