भंडारा : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून राज्यातील वाळू माफियांनी महसूल अधिकाऱ्यांच्या डोक्याला चांगलाच ताप दिलेला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील महसूल अधिकारीवर होणाऱ्या हल्याच्या घटना कुठेही कमी होत असतांना दिसून येत नाही तर वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने कारवाई करण्यास गेलेल्या महसूल विभागातील पथकातील अधिकाऱ्यांच्या अंगावर थेट ट्रॅक्टर चालविला. यात तलाठी किरण मोरे यांच्या पायावरून चाक गेल्याने हाड मोडल्याची घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी तालुक्यातील खातखेडा रेती घाटावर हा प्रकार घडला. याप्रकरणी आशिष काटेखाये (३५), पंकज काटेखाये (३३) या दोघांना अटक करण्यात आली असून, तिसरा अनोळखी व्यक्ती फरार आहे
नदी घाटातून विना नंबरचा ट्रॅक्टर बाहेर येताना दिसताच चालकाला थांबवून टॉर्चच्या उजेडात झाडाझडती घेतली. ट्रॉलीमध्ये एक ब्रास रेती दिसल्याने रॉयल्टीसंदर्भात विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचे चालकाने सांगितले. मोरे यांनी चालकाकडून चाबी ताब्यात घेऊन जप्तीची कारवाई सुरू करताच दुचाकीने मालक व एक अनोळखी व्यक्ती घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी, तुम्ही माझाच ट्रॅक्टर वारंवार कसा चालान करता? तुमचा बंदोबस्त लावतो, असे म्हणून मोरे यांच्या हातामधून चावी हिसकावली.