लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्ह्यात जलग्रामोत्सव या नावाने प्रसिद्ध असलेले जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची परंपरा असलेले श्रीराम मंदिर संस्थानतर्फे दरवर्षी रथोत्सव मोठया उत्साहात पार पडतो. यावर्षी रथोत्सवाचे हे १४९ वे वर्ष असून श्रीराम मंदिर संस्थानचे विश्वस्त गादीपती हभप मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता मंदिराच्या प्रांगणात श्रीराम रथाचे महापुजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कार्तिक प्रबोधिनी एकादशीनिमित्त जळगाव शहरातून रथोत्सवास मोठया उत्साहाने भक्तीभावाने करण्यात येते. त्यानुसार १५ नोव्हंेंबर कार्तिक शुद्ध एकादशी सोमवारी सकाळी ४ वाजता काकडआरती, प्रभूरामचंद्रांच्या मूर्तीस महाभिषेक, सकाळी ७ वाजता महाआरतीनंतर पंचपदी सांप्रदायिक भजनाने वातावरण मंत्रमुग्ध होउन गेले होते. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास मंदिराच्या प्रांगणात गादीपती मंंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते श्रीराम रथाची महाआरती करण्यात येवून रथावर गरूड, मारूती, अर्जुन, दोन लाकडी घोडे आदी मूर्त्यांनी युक्त असलेल्या झेंडूंच्या फूलांनी सजवलेल्या श्रीरामासह वहनांचे पूजन करण्यात आले. यानंतर प्रभूश्रीरामचंद्रांची उत्सवमूर्ती श्रीराम रथात स्थानापन्न करण्यात आली. यावेळी जय श्रीराम प्रभूरामचंद्र नामाचा गजर करण्यात आला.
श्रीप्रभूरामचंद्राच्या महाभिषेक व महाआरतीनंतर उत्सवमूर्ती रथात स्थानापन्न केल्यानंतर रथाचे पूजन गादीपती मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, आ. राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, आ. चंदूलाल पटेल, पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंंढे, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, शहर पो.स्टे.चे पोलीस निरिक्षक, श्रीराम मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी सेवेकरी, आदी पदाधिकारी उपस्थित होते. श्रीराम रथाचे विधिवत पूजनानंतर आरतीहोउन श्रीराम नामाचा जयघोष उपस्थित भक्तगणांकडून करण्यात येवून सकाळी ११.५० वाजता रथोत्सव मिरवणूकीस सुरूवात करण्यात आली.
रथोत्सवाच्या पुढे मंगलवाद्य सनई चौघडा, नगारा, झेंडेकरी पथक, बँड पथक, त्यानंतर वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ, संत मुक्ताबाईंच्या पादुकांची पालखी व त्यानंतर रथ अशा क्रमाने रथ मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रथ मार्गात असलेल्या महावितरणच्या विजवाहिन्यांचा अडथळा दूर करण्यासाठी रथावर दोन्ही बाजूस सेेवेकर्यांकडून लाकडी पट्टया लावलेल्या काठ्यांचा टेकू देउन वीज वाहिन्या वर उचलून घेत रथाचा मार्ग सुकर करण्यासाठी प्रयत्नशील होते. तसेच रथोत्सवादरम्यान अनुचीत प्रकार होउ नये शांतता सुव्यवस्थेसाठी जागोजागी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कचखडी टाकून रथाचा मार्ग सुकर
रथ ज्या मार्गाने जाणार त्या त्या मार्गावर रस्त्यांवरील खड्डे स्थानिक मनपा प्रशासनाकडून कचखडीने बुजविण्यात येवून स्वच्छता कर्मचार्यांकडून रस्त्यावरील केरकचरा साफसफाई करण्यात आली असल्याचेही दिसून आले.
श्रीराम मंदिर संस्थानपासून प्रभूरामचंद्राचा रथ मार्गस्थ करण्यात येवून कोल्हे वाडा, आंबेडकर नगर, चौधरी वाडा, तेली चौक, मंदिराच्या मागील गल्लीतून रथ चौक मार्गे बोहरा गल्ली तसेच सुभाष चौक, दाणा बाजार यामार्गाने आणण्यात आला. दरम्यान रस्त्यावर जागोजागी भाविक भक्तांकडून प्रभूरामचंद्राचे दर्शन घेवून रथावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती.