जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शनिपेठेतील काट्याफाईल भागात बुधवारी मध्यरात्री दोन गटात झालेल्या दंगलीप्रकरणी काट्यफाईल भागातील १८ पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी १३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. यामध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
बुधवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान, गाडीचा कट लागल्यावरुन काही जणांमध्ये वाद झाला. त्यानंतर रात्री २ वाजेच्या सुमारास या वादाचे रुपांतर दोन्ही गटात हाणामारी होऊन त्याचे रूपांतर दंगलीत झाले. एकमेकांमध्ये दगडफेक तसेच दारूच्या बाटल्या फेकण्यात आल्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनीपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी संजय शेलार योगेश माळी व मुकुंद गंगावणे हे घटनास्थळी पोहचले. त्याठिकाणी दोन गटात दगडफेक सुरु असल्याने मध्यस्थी सुरु असताना, काही जणांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. त्यात मुकुंद गंगावणे या पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्याला दगड लागला. त्यानंतर वाद वाढल्यानंतर शनिपेठ पोलीस स्टेशनचे इतर कर्मचारी घटनास्थळावर आले. या घटनेत जखमी झालेल्या पोलिसावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्यासह शहरातील अधिकारीही मध्यरात्री घटनास्थळी दाखल झाले. गुरुवारी या भागातील परिस्थिती सर्वसामान्य झाली होती.