चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील हातगाव येथील विसापूर तांडा येथे एका महिलेवर चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून दुचाकीच्या स्टीलच्या दांड्याने तिच्या डोक्यावर वार करण्यात आला. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोयगाव तालुक्यातील दस्तापूर येथील रहिवासी थापाबाई पोपट सोनवणे यांचे कुटुंब रहिवासी असून ते हल्ली विसापूर तांडा येथे रहिवास करत आहेत. थापाबाई ही महिला बुधवारी पहाटे ४ वाजेदरम्यान झोपेत असताना तिचा पती पोपट शांताराम सोनवणे याने दुचाकीच्या स्टीलच्या दांड्याने तिच्या डोक्यात वार करून गंभीर दुखापत केली. याबाबतची फिर्याद निंबा रूपचंद वाघ ( विसापूर तांडा) यांनी पोलिस ठाण्यात दिली. आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपीस जागेवरच अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हे करीत आहेत. या महिलेस उपचारार्थ धुळे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.