जळगाव – जळगाव शहरातील एमआयडीसी परिसर सकाळी साडेदहाच्या सुमारास तरुणावर गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे जळगाव शहर हादरले असून शहरातील कायदासुव्यवस्थे बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना जुन्या वादातून प्रभा पॉलिमर सेक्टर या ठिकाणी आली असून घटनेनंतर संशयित आरोपी हा इतर दोघांसोबत फरार झाला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक मारेकऱ्यांच्या मागावर असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशय आरोपीला पोलिसांनी अर्ध्या तासातच पकडले आहे.
जळगाव शहरामध्ये काही दिवसापूर्वी गोळीबार झाल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. पुन्हा एकदा गोळीबार झाल्याच्या घटनेमुळे शहर हादरले आहे. या घटनेत आकाश प्रेम तंवर (वय २४, रा. गजानन पार्क, कुसुंबा ता. जळगाव) यांच्या फिर्यादनुसार आज गुरुवार १० रोजी सकाळी साडेदहा वाजता कंपनीत कामावर जात होता. एमआयडीसी सेक्टर नंबर व्ही येथील प्रभा पॉलिमर कंपनी जवळ जात असताना आकाश तंवर त्याचा मित्र रोहित पवार तसेच अनिल सैंदाणे, समाधान पाटील, भरत चांदवडे, धीरज पवार हे गप्पा करीत उभे होते. या वेळी संशयित आरोपी स्वप्निल उर्फ सोपान चंदूसिंग मोरे (रा. गजानन पार्क, कुसुंबा) हा त्याचे मित्र विपुल पाटील व अजय पाटील (दोन्ही रा. कुसुंबा) यांच्यासोबत आला. स्वप्नील आकाश तंवर याला, बब्या कुठे आहे, त्याने तुझ्या सांगण्यावरून मला मारले आहे. आज तुमच्या दोघांचा गेम करतो. त्यावर आकाश तंवर याने, बाब्याबाबत मला काही माहिती नसल्याचे सांगितले. याचे वाईट वाटून स्वप्नील मोरे याने कमरेला लावलेला गावठी कट्टा काढून आकाश तंवर याच्यावर रोखून आधी तुझे व नंतर बब्याचे काम करतो असे म्हणत गोळी झाडली. आकाशने खाली वाकून गोळीचा नेम चुकवला आणि रस्त्यात पडलेला दगड उचलून संशयित स्वप्नील मोरे यांच्या दिशेने फेकला. त्यानंतर स्वप्निल मोरे याने पुन्हा दुसरी गोळी आकाश तंवर याच्यावर फायर केली. ही गोळी आकाशच्या अंगाच्या जवळून गेली. नंतर पुन्हा तिसरी गोळी झाडत असताना त्याचे बंदूक अडकले. त्यामुळे घाबरून आकाश याने पुन्हा दुसरा दगड उचलून त्याच्यावर फेकत असताना स्वप्नील मोरे आकाश याच्या जवळ गेला. डोक्यावर बंदुकीने मारले. नंतर आकाशच्या हातात दगड सापडल्याने तो पळून गेला.
ही घटना आकाश तंवरच्या मित्रांनी पाहिली. संशयित स्वप्नील मोरे यांच्यासोबत आलेले विपुल पाटील, अजय पाटील हे लगेच मोटरसायकल घेऊन त्याच्यामागे गेले आणि त्याला दुचाकीवर बसून प्रभा पॉलिमर येथून निघून गेले. त्यानंतर आकाश तंवर याने त्याचा काका राजेश पवार यांना घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले. त्या ठिकाणी त्याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी संदीप गावित, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी प्रत्यक्ष भेट दिली.