औरंगाबाद : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील पिशोर येथे मुलीसोबतच्या प्रेमप्रकरणातून २२ वर्षीय तरुणाला मारहाण करून विहिरीत फेकून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना कन्नड तालुक्यातील खातखेडा येथे सोमवारी रात्री घडली. नारायण रतन पवार असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीसह १८ नातेवाइकांविरुद्ध पिशोर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण पवार हा तरुण रविवारी सायंकाळी घरासमोर बाहेर बसला होता. यावेळी एका सात वर्षीय चिमुकल्याने एक चिठ्ठी आणून नारायणच्या दरवाजात टाकली. सदरील चिठ्ठी ही घरासमोर राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीने पाठविली असून, त्यात मला तुझी खूप आठवण येते. माझ्यावर प्रेम असेल तर मला दूर घेऊन चल, अशा प्रकारचा मजकूर लिहिलेला असल्याचे समजले. नारायणचे वडील रतन पवार, आई मीराबाई यांनी सोमवारी सकाळी ही चिठ्ठी मुलीच्या आई-वडिलांना दाखविली. मुलीला समोर बोलावून विचारले असता मी चिठ्ठी लिहिली नाही, असे मुलीने सांगितले. यावरून मुलीचे वडील राजेंद्र काकुळते यांनी नारायणला मारहाण केली. त्यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास प्रवीण नारायण काकुळते याने नारायणला घरातून बाहेर ओढून १७ ते १८ जणांनी जबर मारहाण केली. प्रदीप काकुळते, राजेंद्र काकुळते, सचिन काकुळते व सचिन निकम यांनी नारायण यास उचलून नेऊन विहिरीमध्ये फेकून दिले. पोहता येत नसल्याने नारायण हा विहिरीत बुडाला. मंगळवारी नारायण पवार याच्यावर पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत रतण पवार यांच्या फिर्यादीवरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, आरोपींना १० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली