चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव शहरात दूध सागर मार्गासह अन्य भागातील दूध डेअरींवर बुधवारी जिल्हा दूध व दुग्धजन्य भेसळ प्रतिबंधक समितीने छापे टाकले. यात आठ डेअरींमध्ये दुधात भेसळ आढळून आल्याने १३८२ लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट करण्यात आले. या धडक कारवाईमुळे दूध संकलन, विक्री करणाऱ्या व दूग्धजन्य पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही छापेमारी सकाळपासून दुपारपर्यंत सुरू होती. एकेकाळी मुंबईच्या गल्लीबोळात चाळीसगाव आणि दूध असे समीकरण तयार झाले. १९९० ते २००५ पर्यंत हा व्यवसाय येथे भरभराटीला आला होता. एका आठवड्यात २०० कोटी रुपयांची उलाढाल व्हायची. दरदिवशी चाळीसगावातून लाखो लिटर दूध मुंबईला जायचे. मात्र पुढील काळात दुधाचा दर्जा खालावल्याने येथील व्यवसायाला उतरती कळा लागली. सद्य:स्थितीत नावालाच व्यवसाय उरला असून बुधवारी झालेल्या छापेमारीत दुधात होणारी भेसळ उघड झाल्याने या व्यवसायाच्या भवितव्यावरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चाळीसगाव परिसरातील ८ डेअरींमधील दुधात भेसळ आढळून आल्यानंतर त्यातील नमुने जागेवर तपासण्यात आले. स. कृ. कांबळे व त्यांचे कर्मचारी, पोलिस अधिकारी व डेअरी मालक यांच्यासमोर पंचनामा करण्यात आला. यानंतर १३८२ लिटर भेसळ असलेले दूध जागेवरच गटारींमध्ये ओतून नष्ट करण्यात आले. यामुळे दूध सागर मार्गावरील काही गटारींमध्ये दूध वाहत असल्याचे दृश्य निर्माण झाले होते. अचानक झालेल्या या कारवाईमुळे डेअरी चालक चांगलेच धास्तावले आहे. भेसळ करणाऱ्या डेअरी चालकांसह दूग्धजन्य पदार्थ विक्रेत्यांवर काय कारवाई होणार, याविषयी उत्सुकता आहे.
कारवाईचे सत्र सुरूच राहणार
दूध व दूग्धजन्य पदार्थामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी पथकाची कारवाई यापुढेही अशीच सुरु राहणार असल्याचे वाय. आर. नागरे यांनी स्पष्ट केले आहे. जनतेलाही भेसळ थांबविण्यासाठी तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.