मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईतील मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. येत्या एक ते दोन दिवसांत दहशतवादी हल्ल्याची धमकी या फोनद्वारे देण्यात आली आहे. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात सोमवारी रात्री 10 वाजता हा फोन आला असल्याचे समजते. या फोनमुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे आता मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.
याप्रकरणी पोलीस तपास करत असून हा फोन कोणी केला? कोणत्या उद्देशाने केला? खरेच काही अतिरेकी कारवाईचा कट आहे, की केवळ दहशत माजवण्याच्या उद्देशाने हा फोन करण्यात आला आहे, याबाबत मुंबई पोलीस तपास करत आहेत. तपासानंतर सर्व सत्य समोर येईल. परंतु, सातत्याने येणाऱ्या अशा धमकीच्या फोनमुळे मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर आहे, का असा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान, अतिरेकी हल्ला नेमका कोणत्या ठिकाणी होणार याचे ठिकाण धमकीच्या फोनमध्ये सांगण्यात आलेले नाही. धमकीचा फोन येताच याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. धमकीचा कॉल ट्रेस (Call Trace) करण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर तपासात कांदिवली येथून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.