धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मुख्य रस्त्यावर असलेल्या सोन्याच्या दुकानात पहाटेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांची चाहूल शेजारी राहणाऱ्या नागरिकांना लागल्याने चोरटे पसार झाले.
नेरी येथील सचिन पाटील यांचे सिद्धी ज्वेलर्स नावाने दुकान आहे. सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास एका कारमधून चोरटे चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. यावेळी त्यांच्या हातात टॉमी व अन्य साहित्य होते. यावेळी काहीतरी पडल्याची चाहूल शेजारी राहणाऱ्या लोकांना लागली. ते पाहण्यासाठी ते बाहेर आले असता त्यांना चोरटे दिसले. त्यांनी ‘चोर चोर म्हणून आरडाओरड केली. यावेळी इतर नागरिकही जागे झाले. नागरिक जागे होताच चोरट्यांनी कारमधून पलायन केले. त्यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधलेला असल्याने त्यांचे चेहरे दिसू शकले नाहीत. वास्तविक पाळधी पोलिस चौकीच्या मागेच हे दुकान आहे. येथे वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.