छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
अनेक जिल्ह्यात शिंदे व ठाकरे गटाचे नेते एकमेकांच्या विरोधात कुरघोडी करीत असतांना दिसत आहे. आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्यात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.
औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हे दोन नेते आपसात भिडले. दोन नेत्यांच्या वादावादीचा व्हिडीओ समोर आला आहे.विरोधी पक्षातील आमदारांना पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. यावर औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी प्रत्युत्तर दिलं. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी अंबादास दानवे हे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेले. याबाबतचा एक व्हिडीओही समोर आला आहे. खरं तर, आज जिल्हा अधिकारी कार्यालयात औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पालकमंत्री संदीपान भुमरे निधी देत नाहीत, असा आरोप कन्नड मतदारसंघाच्या आमदाराने केला. याच मुद्द्यावरून अंबादास दानवे आक्रमक झाले. यानंतर काही वेळाने दोन्ही नेत्यांमधील वाद थांबल्याची माहिती मिळाली आहे.