मुंबई : वृत्तसंस्था
देशात सन २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे सावट आले असतांना अनेक शाळा मोबाईलने अभ्यास देत असल्याने प्रत्येक मुलाकडे मोबाईल होते व शिक्षक देखील मुलांना मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण देत होते. पण आता कोरोनाचे सावट संपले असून सर्व काही सुरळीत झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात माध्यमिक शाळांच्या वर्गात शिक्षकांना मोबाईल बंदी करण्यात आली आहे. शिक्षक मोबाईलमध्ये व्यस्त असताना शिक्षणावर परिणाम होऊ नये, तसेच शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून हा निर्णय जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आला आहे. तर काही शाळांत मोबाईलमुळे अनुचित प्रकार घडल्याने ही शिक्षण विभागाला ही कडक भुमीका घ्यावी लागली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील भौतिक सुविधा सुधारण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासह शिस्त पालनसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी शाळांना एक परिपत्रक जारी केलयं. यामध्ये शिक्षकांना वर्गात अध्यापन करताना मोबाईल वापरता येणार नाही; अशी सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांना वर्गात जाताना मोबाईल पार्कींगमध्ये आपला मोबाईल जमा करुनच अध्यापन करायचं आहे. या निर्णयाची काटेकोर अमंलबजावणी पन्हाळा तालुक्यातील काही शाळांमध्ये सुरू झाल्याच पहावयास मिळत आहे. दरम्यान या निर्णयाच स्वागत करत शैक्षणिक गुणवत्ता वाढण्याबरोबर शिक्षकांमध्ये संवाद सुरू झाल्याच मुख्याध्यापकांनी म्हटलंय.
दरम्यान शैक्षणिक साहित्य म्हणून अध्यापनासाठी मोबाईलचा वापर करायचा असल्यास मुख्याध्यापकांच्या परवानगीने टाचन वहीत नोंद करून संबधित शिक्षकांना मोबाईल वापरता येणार असल्याच शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी सांगितलं. शिक्षणाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे शाळा व्यवस्थापनाने काटेकोरपणे पालन केल्यास अध्यापनासह शिक्षणाच्या दर्जामध्ये देखील सुधारणा होईल यात शंका नाही. त्यामुळे या निर्णयाच पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.