जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात नियमितपणे बसचा कुठे ना कुठे अपघात होत आहे. नुकतेच भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे भरधाव बसने बंदुकीची पावडर वाहून नेणार्या ट्रकला धडक दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पावणेसात वाजता घडली. या घटनेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी बस चालकाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, आयुध निर्माणी इटारसी येथून बंदुकीत भरण्याची बॉल पावडर घेऊन ट्रक (एम.पी.05 जी.6962) वरणगाव फॅक्टरीत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल आमंत्रण जवळील फॅक्टरी रस्त्यावर ट्रक वळण घेत असताना भुसावळकडून मुक्ताईनगरकडे जाणारी भरघाव बस (एम.एच.बी.टी 4015) ने या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकचे मागच्या बाजूचे नुकसान झाले तर बसच्या पुढच्या बाजूचे नुकसान झाले. दरम्यान, फॅक्टरीचे व्यवस्था अधिकारी राहुल पाटील यांनी अपघातस्थळी भेट दिली. वरणगाव पोलिसात ट्रक चालक संतोष रामस्वरूप यादव (42, आयुध निर्माणी, इटारसी) यांच्या फिर्यादीवरून बस चालक भरतसिंग फुलचंद डुमाले (शिवगाव, गारज, ता.वैजापूर संभाजीनगर) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.