जळगाव : प्रतिनिधी
शहरातील चोरीच्या घटनेमध्ये सातत्याने वाढ होत असतांना पुन्हा एकदा शहरातील एका परिसरातील 55 वर्षीय महिलेचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामानंद नगर परिसरात असलेल्या जीवन नगरातील रहिवासी अशा ज्ञानेश्वर महाले (वय ५५) या दि.४ जुलै रोजी सायंकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास रस्त्याने पायी जात असताना एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील 85 हजार रुपये किमतीचे १७ ग्रॅम वजनाचेसोन्याचे मंगळसूत्र तोडून पळ काढला. आशा महाले यांनी आरडाओरड करूनही उपयोग झाला नाही. याबाबत आशा महाले यांनी तात्काळ रामानंदनगर पोलीस स्टेशन गाठून दोन अज्ञात विरुद्ध फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करीत आहे.