भडगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील बालिकेच्या अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीला गुरुवारी ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पोलिसांनी बंदोबस्तात आणले असता. यावेळी संशयितास आमच्या हवाली करा म्हणून ग्रामस्थांनी पोलिसांशी गोंधळ घातला. त्यातच अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्यामुळे ३ पोलीस जखमी झाले आहेत. परिणामी पोलिसांनी लाठीचार्ज करीत गर्दी पांगवली आहे. यात पोलिसांच्या सरकारी वाहनाचेदेखील दगडफेकीत नुकसान करण्यात आले आहे. यामुळे गोंडगावात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुकयातील गोंडगाव येथील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी जळगाव एलसीबीने कसून तपास करीत त्याला जेरबंद केले. या संशयिताला कायदेशीर कार्यवाहीकरिता संध्याकाळी ५५ ते ६० फौजफाट्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी गावात आणले. यावेळी पोलीस आणि जमाव यांच्यात आरोपीला ताब्यात मागण्यावरून तणाव निर्माण झाला. संशयित आरोपी पोलीस वाहनातच होता. जमाव पोलिसांशी आक्रमक होऊन हुज्जत घालीत असताना अचानक कोणीतरी दगडफेक सुरु केली. यात ३ पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळाली.पोलिसांच्या सरकारी वाहनाचेदेखील दगडफेकीत नुकसान करण्यात आले आहे.


