जळगाव – जळगाव जिल्ह्यात अनधिकृत गौणखनिज उत्खनन व वाहतुक अर्थात वाळू माफिया विरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने आता त्यांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेसाठी सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली असून सहा पथकांच्या वाहनांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी हिरवी झेंडे दाखवून मोहिमेला सुरुवात केली आहे.
जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व त्याचा वाहतूक सुसाट सुरू होती. त्यामुळे वाळू माफियांची मुजरी दिवसेंदिवस वाढत होती. तसेच अवैध वाळू वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात अपघातांच्या घटना देखील वाढत होत्या. तसेच नदी पात्रात बेनुसार वाळू उत्खनन केल्यामुळे नदी लगत असलेल्या गावांमध्ये भूजल पातळी कमी होत होती. अशा विविध तक्रारीवरून महसूल व पोलीस प्रशासन आता ॲक्शन मोडवर आलेले आहे. या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक विरोधात आता धडक मोहीम सुरू करण्यात येत आहे. या मोहिमेचा बुधवारी शुभारंभ विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आदी उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड, धरणगाव तहसीलदार महेद्र सूर्यवंशी यांच्यासह मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.
आता धडक मोहीम..
महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांचे सहा पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक जळगाव जिल्हात अनधिकृत गौणखनिज उत्खनन व वाहतुक विरोधात धडक कारवाई करणार आहे. त्यामुळे आता वाळू माफियांचे धाबे दणाणले असून पथकाद्वारे कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे.


