चोपडा शहरातील बसस्थानकावर जळगाव बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत खिसेकापूने एका प्रवाशाच्या पँटच्या डाव्या खिशातून २० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना ३१ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी चोपडा शहरातील शिव कॉलनीतील रहिवासी भय्यासाहेब विजय पाटील (३४) हे दुपारी १२ वाजता कामानिमित्त जळगाव जाण्यासाठी बसस्थानकावर आले. बसची वाट बघत असताना चोपडा धरणगावमार्गे जळगाव बस (एमएच २० बीएल १४०७) प्लॅटफार्मवर लागली असता प्रवाशांच्या गर्दीत पाटील जळगावला जाण्यासाठी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात खिसेकापूने त्यांच्या पँटच्या डाव्या खिशातून २० हजार रुपयांच्या नोटा लंपास केल्या. खिसा कापला गेल्याचे पाटील यांच्या लक्षात आले; परंतु तोपर्यंत अज्ञात चोरटा फरार झाला होता. याबाबत भय्यासाहेब विजय पाटील (३४) यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस स्टेशनला भादंवि कलम ३७९प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक महेंद्र साळुंखे करीत आहेत.