मुंबई : वृत्तसंस्था
मराठी चित्रपटसृष्टीवर एक मोठी शोककळा पोहचली असून नुकतेच प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये नितीन चंद्रकांत देसाईंनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. बुधवारी 2 ऑगस्ट 2023 रोजी पहाटे चार वाजता गळफास घेऊन नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. सफाई कामगार सफाईसाठी त्यांच्या रुममध्ये गेला असता नितीन देसाईंनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.
नितीन देसाई यांनी प्रोडक्शन डिझायनर म्हणूनही ‘लगान’, ‘हम दिल दे छुके सनम’, ‘मिशन काश्मीर’, ‘देवदास’, ‘खाकी’, ‘स्वदेस’ आदी सिनेमांसाठी काम केलं. सन 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ आणि 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देवदास’ चित्रपटांसाठी त्यांना उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या सिनेमासाठी उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ मिळाला होता.