जळगाव : प्रतिनिधी
राज्यात अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्या माफियांवर लगाम लावण्यासाठी शासनाने वाळू ही प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. जळगाव जिल्ह्यात अद्याप ही यंत्रणा सुरू झाली नाही. नियम हे सर्वांना सारखे असल्यामुळे याची प्रचिती आज नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले.
नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पदभार सांभाळल्यावर पहिल्याच बैठकीत सर्व वाळू माफियांना तंबी दिल्याने जिल्ह्यात वाळूमाफिया मध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली. त्यामुळे चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील स्वच्छतागृहाचे वाळू मिळत नसल्यामुळे काम थांबले असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानामधील स्वच्छतागृहाचे नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामाला वाळू लागत असल्यामुळे काम करणाऱ्या ठेकेदाराला वाळू मिळत नसल्यामुळे हे काम थांबवावे लागले. ही समस्या जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे ठेकेदार यांनी सांगितले. यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नियम हा सर्वांना सारखा असून जेव्हा वाळू उपलब्ध होईल तेव्हा काम करण्याची सूचना ठेकेदाराला दिल्या. त्यामुळे त्यांच्या या कृतीबद्दल सर्वसामान्यातून कौतुक होत आहे.
नियम सर्वांना सारखे लागू..!
जिल्ह्यातील एक उच्चपद जिल्हाधिकारी यांचे असून या पदाचा कोणताही दुरुपयोग न होऊ देणे हा पदाचा बहुमान असतो. त्यामुळे वाळू सर्वांसाठी बंद असताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नियम हा सर्वांना सारखा असल्याचे उदाहरण देत त्यांच्या स्वतःचे निवासस्थानातील काम थांबविले आहे.
वाळू मिळत नसल्याने अनेक बांधकामांना ब्रेक..
वाळू बंदी असल्यामुळे शहरासह जिल्ह्यात अनेक बांधकामांना वाळू अभावी ब्रेक लागला आहे. त्यामुळे अनेक बांधकाम व्यवसायिक व मालक जिल्हाधिकारी कार्यालयात वाळू मिळत नसल्याबाबत तसेच दोन ते तीन पट अधिक दराने अवैध वाळू माफिया वाळू देत असल्याबाबत तक्रारी करण्यासाठी नागरिक जिल्हाधिकारी कडे येत आहे.
अवैध वाळू व्यवसायाला लावला लगाम
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील अनेक वाळू माफियांना चांगलाच लगाम लावल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाळू माफिया यांची चांगलीच तारांबळ देखील उडाली आहे.