जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज जिल्हा निबंधक यांना मधुकर सहकारी साखर कारखान्यास पुरविलेल्या उसाची रक्कम मिळण्याबाबत नशिराबाद सह केळी, निमगांव येथील उस उत्पादक शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हंटले आहे कि, उस उत्पादक शेतकरी असून सन 2018-19 या वर्षी आमच्या उसाची लागवड करून मधुकर सहकारी साखर कारखान्यात नोंदविलेला होता. आमचा लागवड केलेला संपूर्ण उस मधुकर सहकारी साखर कारखान्यास पुरविला होता. आज 5 वर्षे उलटूनही आम्हा शेतकऱ्यांना आमच्या उसाची रक्कम कारखान्याकडून मिळालेली नाही.
निसर्गावर अवलंबून असलेला शेतकरी कष्ट करून उत्पादन घेतल्यावर येणाऱ्या रकमेवर पुढील हंगामाची तयारी करत असतो. परंतू अद्यापपावेतो उसाच्या रकमेची कारखान्याकडून परतफेड न झाल्याने आम्ही सर्व शेतकरी फार मोठ्या आर्थिक विवंचनेत अडकलो आहोत. हतबल व हवालदिल झालेले असतांना सुध्दा कारखान्याच्या अडचणी समजून आजपावेतो सर्व सहन करीत होतो. जिल्हा बँकेने सदरचा मधुकर सहकारी साखर कारखाना विकून त्यांचे कारखान्याकडे येणे असलेले कर्ज व्याजासकट वसूल केले, पण शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मुद्दल स्वरूपातही मिळाली नाही. जिल्हा बँकेने मे. न्यायालयात कारखान्याचे 20 कोटी रूपये खर्चास स्थगिती मिळविलेली असल्याने ती रक्कम बँकेत पडून आहे. जिल्हा बँकेचे कारखान्याकडे येणे असलेली रक्कम पुर्ण वसूल केल्याने न्यायालयाने खर्चास स्थगिती दिलेल्या 20 कोटी रूपये या रक्कमेतून आता आम्हाला आमची रक्कम मिळणेस काहीएक हरकत नसावी. त्या रक्कमेतून आमची उसाची रक्कम आम्हाला मिळावी. शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत होण्याच्या आधी आम्हाला आमची देय असलेली रक्कम त्वरीत देण्यात यावी. अन्यथा येणाऱ्या काळात शेतकरी आक्रमक आंदोलन करू शकतात.
मधुकर सहकारी साखर कारखान्याची स्थिती सुधारण्यासाठी शेतकरी नेहमीच प्रयत्नशिल राहीला असून, पुढेही शेतकऱ्यांच्या भरवशावरच कारखान्याची प्रगती अवलंबून आहे. त्यामुळे आमच्या हक्काची असलेली रक्कम आम्हाला परत मिळावी, यास्तव सदरचा विनंती अर्ज आपल्या सेवेशी सादर करीत आहोत. संबंधित मधुकर सहकारी साखर कारखान्यावर आपल्या विभागाचे अधिकारी श्री. चंद्रकांत गवळी हे प्रशासक असून आपल्या स्तरावरून त्यांना योग्य त्या सुचना देण्यात याव्या, ही विनंती. येत्या पंधरवाड्यात सदरचा निर्णय तडीस नेण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार रहाल. शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल सहानुभुतीपुर्वक विचार करावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर गिरीश चौधरी, चंद्रकांत नारखेडे, खेमचंद नारखेडे, काशिनाथ पाटील, अशोक नेमाडे, राजेश नेमाडे यांच्यासह आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.