मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या दोन महिन्यापासून राज्यातील सर्वात महत्वाचा मानला जाणारा मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सोमवारी रात्री बांधकाम सुरू असलेल्या पुलावर भीषण दुर्घटना घडली असून रात्री पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना क्रेन कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून अंधार असल्याने नेमके किती जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत हे समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू आहे. एका खासगी कंपनीने या कामाचे कंत्राट घेतले आहे. सोमवारी रात्री पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू होते. पुलावरील गर्डर जोडणारे क्रेन साधारण १०० फुटांवरून खाली कोसळले. त्यात १० ते १२ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची भीती प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. प्रशासनाने आत्तापर्यंत आठ जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे. गेल्या महिनाभरापासून वाढत्या अपघातांमुळे समृद्धी महामार्ग चर्चेत आहे. महामार्गावर ३५८ हून अधिक अपघात झाले असून १०२ व्यक्तींचा या अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे.