जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जळगाव ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांनी आज शेतकऱ्याबाबत वेगवेगळ्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, शेतकऱ्यांच्या शेती पिकाला नुकसानीपासून आर्थिक संरक्षण कवच प्राप्त करून देणाऱ्या “पंतप्रधान पीक विमा” आता रू. 1/- मध्ये निघत आहे. सदर पीक विम्याचा हप्ता राज्य शासन उचलत असल्याने शेतकऱ्यांनाही ही योजना नविन आर्थिक संजीवनीच ठरणार आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्यांना विम्याची रक्कम मिळाल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ येणार नाही व शेतकरी हवालदिल होण्यापासून परावृत्त होणार, निसर्गावर अवलंबून असलेला शेतकरी हा निसर्गाच्या लहरीपणामुळे मेटाकुटीला आलेला आहे. येणाऱ्या प्रत्येक वर्षी काही ना काही नैसर्गिक संकट येते, त्यामुळे प्रत्येक हंगामात नापिकी ही शेतकऱ्यांची नेहमीचीच समस्या होऊन बसली आहे. त्यावर पंतप्रधान पीक विमा शेतकरी रू. 1/- मध्ये काढू शकतो व त्याचा हप्ता राज्य शासन भरणार यामुळे त्याचे पीकाचे नुकसान झाल्यास विम्याची रक्कम मिळणार असल्याने शेतकऱ्यांची ‘आथीही गेली आणि पोथीही गेली अशी अवस्था होणार नाही. ‘परंतू शेतकरी फक्त नैसर्गिक आपत्तीनेच त्रस्त नसून वन्य प्राण्यांपासूनही शेतकरी फार मोठ्या प्रमाणावर पीकांचे नुकसान सहन करीत असतो. पर्यावरणाचा झालेला असमतोल, मानवाने निसर्गावर केलेली मात, कमी झालेली जंगले यामुळे जंगलातील वन्य प्राणी यांचे शेती पिकावर होत असलेले आक्रमण, तसेच पाणवठ्यांचे कमी झालेले प्रमाण यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी शेतात घुसुन शेती पिकाचे करीत असलेले नुकसान यामुळेही शेतकरी फार मोठ्या प्रमाणात हवालदिल झालेले आहेत.. वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या पीकाची नासधुस करून पीकांवर डल्ला मारून शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त करीत असतात. वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असते. वन्यप्राण्यांमध्ये निलगाई, हरिण, रानडुक्कर अशा प्राण्यांमुळे पीकाचे नुकसान होत असतांना वाघ, चित्ता, तडस अशा हिंस्त्र प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या जीवाला धोका असतो.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे पीक वन्य प्राण्यांद्वारे नुकसान झाल्यास, सदरचे नुकसान पंतप्रधान पीक विम्यात समाविष्ट केल्यास शेतकऱ्यांना बयाच अंशी दिलासा मिळणार आहे. सद्यस्थितीत वन्य प्राण्यांपासून शेतीपिकाचे नुकसान झाल्यास शासन मदत देते, परंतू ती मदत तोकड्या स्वरूपाची असल्याने वन्य प्राण्यांपासून झालेल्या नुकसानास पंतप्रधान पीक विम्यात समाविष्ट करावे व शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आर्थिक आश्वस्त करावे ही विनंती या निवेदनामार्फत काही आपणास करीत आहोत. पंतप्रधान पीक विमा ऑनलाईन नोंदणी करतांना बराच वेळ लागत असल्याने व सदर विम्याचे ऑनलाईन संकेतस्थळ सर्व्हर डाऊन असल्याने बहुतेक शेतकरी या योजनेत नोंदणी करण्यापासून वंचित आहेत, 31 जुलै 2023 ही खरिप हंगामासाठीची अंतिम मुदत असल्याने सदरची मुदत ही वाढवून मिळाल्यास प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पीक विमा योजना पोहचण्यास मदत होईल. तेव्हा आपणास विनंती की, या योजनेचे मुदत वाढीसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. आमच्या भावना शेतकऱ्यांच्या हिताच्या असल्याने शासनाकडे आपल्या मार्फत पोहचवाव्यात. अशा आशयाचे निवेदन पंकज श्यामकांत महाजन यांनी दिले असून या निवेदनावर विनोद भगवान रंधे, सय्यद बरकत सैयद युसुफ अली यांच्या सही आहेत.