जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेंच्या पथकाने जिल्ह्यातील बोदवडसह मुक्ताईनगर, मलकापूर व सूरत येथील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून याप्रकरणी मुक्ताईनगरातील चोरीच्या पाच दुचाकींसह दुचाकी चोरटा संशयित आरोपी सागर रामदास कोळी याला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून एक लाख दहा हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सागर कोळी हा चोरीच्या दुचाकी बाळगून असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. पथकाने आरोपीला ताब्यात घेताच त्याने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली देत पाच दुचाकी काढून दिल्या. आरोपीला बोदवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व रमेश चोपडे, जळगाव गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दीपक पाटील, कमलाकर बागुल, अनिल देशमुख, महेश महाजन, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, चालक मोतीलाल चौधरी आदींच्या पथकाने केली.