जळगाव : प्रतिनिधी
शहरात गेली चार दिवसापूर्वी के.सी.पार्क परिसरात रात्री ८ वाजेच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणी आता जळगाव महापालिकेच्या हद्दीतील जळगाव सर्वे नंबर ३२६/२, प्लॉट नंबर ३८ या ठिकाणी तळमजल्यावर शौचालय, बाथरूम व दोन दुकाने तसेच पहिला मजला असे विनापरवाना व अनधिकृत वाढीव बांधकाम केल्याप्रकरणी महापालिकेच्या नगर रचना विभागाने अशोक नारायण माने यांना नोटीस बजावली आहे. हे बांधकाम का पाडण्यात येऊ नये, अशी विचारणा करून ३० दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे नोटिसीमध्ये म्हटले आहे. तीन दिवसांपूर्वी गुरुवार, २७ जुलै रोजी याच ठिकाणी गोळीबाराची घटना झाली होती.
आव्हाणे रस्त्यावरील के. सी. पार्क, त्रिभुवन कॉलनी या ठिकाणी प्लॉट नंबर ३८ मध्ये तळमजल्यावर शौचालय, बाथरूम व दोन दुकाने बांधण्यात आली आहे. यासोबतच पहिला मजला असून तो विनापरवाना व अनधिकृत वाढीव बांधकाम असल्याचे निदर्शनास आल्याने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ कलम ५३ तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २५३ ते २६०, २६१, २६५ व ४७८ नुसार कारवाई करता येऊ शकते. त्यामुळे हे बांधकाम तोडण्याची कायदेशीर कारवाई का करू नये, याचा लेखी खुलासा सर्व कागदपत्रांसह ३० दिवसांच्या महापालिकेला सादर करण्याविषयी नोटीस बजावण्यात आली आहे.
मुदतीत समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास याविषयी संबंधिताचे काही म्हणणे नाही असे ग्राह्य धरून हे अनधिकृत व विनापरवाना बांधकाम पाडण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे. ही नोटीस संबंधित बांधकामाच्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने बजावण्यात आली आहे. याविषयी संबंधित मालमत्ता धारकाशी संपर्क साधला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.