जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरात कामे संपवून घरी जाणाऱ्या महिलेला एका तरुण व तरुणीने ५०० रुपयांची नोट दाखवून ती खरी की खोटी अशी विचारले अन् महिलेला गुंगी आली. त्या वेळी त्या महिलेचे ६७ हजार रुपयांचे दागिने ‘बंटी, बबली’ने हातचलाखी करीत लांबविल्याची घटना २८ जुलै रोजी शिरसोली नाक्यानजीक घडली. या प्रकरणी २९ रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनीमधील रहिवासी असलेल्या सुशीला आनंदा कापडे या वेगवेगळ्या ठिकाणी घरकामं करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात शुक्रवारी दुपारी कामे संपवून त्या घरी जात होत्या. त्या वेळी त्यांच्या मागे एक तरुणी आली व एक तरुण त्यांच्या बरोबर चालत होता.
एका ठिकाणी या तरुणाने महिलेला थांबविले व मला नागपूर येथून मालकाने कामावरून काढून टाकले असून आता मला उज्जैनला जायचे आहे, हा रस्ता बरोबर आहे का? असे त्याने विचारले. त्या वेळी या महिलेने त्याला रस्ता दाखविला. त्या वेळी मागे असलेल्या तरुणीने येऊन पुन्हा महिलेला थांबविले व तरुणाजवळ असलेला एक खोका उघडून दाखवीत त्यातील ५०० नोट खरी आहे कि खोटी असे विचारले, त्यानंतर या महिलेला गुंगी आली व तिला काही समजेनासे झाले. तरुणीने महिलेच्या गळ्यातील सर्व दागिने काढून घेतले.