जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरापासून जवळ असलेल्या व एमआयडीसी मधील एका कंपनीत काम करून आपल्या मामासह रायपूर कंडारी गावात भाड्याने राहत असलेल्या खोलीत परप्रांतीय तरूणाने मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी ३० जुलै रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,बिहार राज्यातील दरबंगा गावातील व सध्या रायपूर कंडारीत रहिवासी असलेल्या गोविंदकुमार बलराम पासवान (वय-३२) हा तरूण आपला मामा अर्जून कुमार यांच्यासोबत गेल्या सहा महिन्यांपासून जळगाव तालुक्यातील रायपुर कंडारी येथे मोहन परदेशी यांच्या घरात भाड्याच्या खोलीत वास्तव्याला होता. गोविंदकुमार पासवान हा एमआयडीसीतील इंडो ऑईल प्रोटीन फूड या खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरीला होता. सोबत राहणारे मामा अर्जून कुमार यांची रात्री पाळी असल्याने ते शनिवारी २९ जुलै रोजी रात्री १० वाजता कंपनीत कामाला निघून आले. त्यानंतर गोविंदकुमार हा घरी एकटाच होता. मध्यरात्री गोविंदकुमार याने छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी ८ मामा अर्जूनकुमार हे घरी आले तेव्हा खोलीचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले तर गोविंदकुमार याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर शेजारी राहणारे ग्रामस्थ व इतरांना दरवाजा तोडून आत प्रवेश करत मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेली नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.