इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील शनिपेठ परिसरातील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक १७ जवळ असलेली जुनी दोन मजली इमारत गुरुवारी दि. ११ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास कोसळली. यामध्ये किरकोळ जखमी झाले असून त्याच्यावर सामान्य रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करण्यात आले आहे जीवित हानी झालेली नाही. यामुळे जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जळगावकर सकाळी गुलाबी थंडीमध्ये गाढ झोपेत असताना शनिपेठ भागांमध्ये इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. महानगरपालिकेची १७ क्रमांकाची शाळा शनिपेठ परिसरात आहे. त्याच्याच समोर असणारी दोन मजली जुनी इमारत गुरुवारी पहाटे ४ ते ४:३० वाजेच्या सुमारास अचानक कोसळली. त्यामुळे नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. यासाठी परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवित हानी टळली आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिस माहिती घेण्याचे काम करीत आहेत. यामुळे इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या दोन मजली इमारतीमधिल राहणाऱ्या नागरिकांचे साहित्य सर्व नष्ट झाले आहे. इमारतीमध्ये जसे आवाज व्हायला लागले तसे वरच्या मजल्यावरील काही नागरिक बाहेर यायचा प्रयत्न करू लागले. मात्र ज्या वेळेला इमारत कोसळली तेव्हा खालच्या मजल्यावर असणाऱ्या वृद्ध महिला मात्र अडकून पडल्या. त्यांना जवळच्या नागरिकांनी तातडीने धाव घेत दगड व इतर मलबा बाजूला सारीत त्यांना बाहेर काढले. त्यांच्या शरीराला प्रचंड जखमा असून मुक्कामार देखील मोठा लागला आहे. ही घटना त्याच इमारतीच्या बाजूला असणाऱ्या एका अनधिकृत बांधकामाला सुरुवात झाल्यामुळे घडली असावी असा नागरिकांचा कयास आहे. याबाबत काही नागरिकांनी या पूर्वी पोलीस स्टेशनला देखील तक्रारी दिल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी शशिकांत बारी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. त्यांनी मदत कार्याला सुरुवात केली. त्यांच्यासोबत संतोष तायडे, रोहिदास चौधरी, भगवान पाटील, प्रदीप धनगर, सरदार पाटील, जगदीश साळुंखे, रवींद्र बोरसे, सोपान जाधव, पन्नालाल सोनवणे, नासिर अली शौकत अली नितीन बारी हे कर्मचारी उपस्थित होते.