मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत येत असलेले शिवप्रतिष्ठानचे मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना आता अमरावतीत केलेले वक्तव्य चांगलेच भोवणार असल्याचे चिन्ह दिसून लागली असून त्यांच्यावर या प्रकरणी राजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात राष्ट्रपित्याबद्दल निंदाजनक विधाने केल्यामुळे काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे गुरुजी यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे. काँग्रेस पक्षाकडून याबाबत शुक्रवारी तक्रार नोंदवण्यात आली होती.
महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या अवमानजनक वक्तव्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देऊन केली आहे. यासंदर्भात तक्रार दाखल करताना नंदकिशोर कुयटे यांनी सांगितले की, महात्मा गांधी यांच्याबद्दल भिडे यांच्या लाजिरवाण्या वक्तव्यामुळे सर्वसामान्य जनमानसांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच, संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पोलिसांनी आपल्याकडे पुरावेही मागितल्याचे कुयटे यांनी सांगितले आहे. संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्याबद्दल त्यांना पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावी, अशी मागणी केली. बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचे काँग्रेस प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांनी सांगितले.