मुंबई : वृत्तसंस्था
देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात संतप्त पडसाद उमटत असून यात यवतमाळमध्ये आंबेडकरवादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी संभाजी भिडेंचे रस्त्यावर लागलेले पोस्टर्स फाडले आहेत. तर, पुणे, अमरावतीसह अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसतर्फे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
आज दि.२९ रोजी संभाजी भिडे यांचा अमरावती शहरात कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी भिडे यांना जिल्ह्यात येण्यास मज्जाव करण्यात यावा, अशी मागणी आंबेडकरी जनआक्रोश मोर्चाने केली आहे. याबाबतचे निवेदनही संघटनेने यवतमाळ जिल्हाधिकार्यांना दिले आहे. तसेच, या कार्यक्रमासाठी शहरात लागलेले संभाजी भिडेंचे पोस्टर्सही आज फाडण्यात आले. हे पोस्टर्स फाडणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले आहे. संभाजी भिडेंविरोधात आज आंबेडकरवादी संघटनाचे कार्यकर्ते रस्त्यावरही उतरले आहेत. संभाजी भिडे यांनी यापूर्वीही महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांना जिल्ह्यात येऊ देवू नये, अशी मागणी आंदोलकांनी केली व संभाजी भिडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध म्हणून पुण्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल अत्यंत घृणास्पद असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.