मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेनेत बंडखोरी करीत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहे. पण ठाकरे गटाने त्यांच्यातील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना निर्णय घेण्यास सांगितले होते.
राहूल नार्वेकरांनी याप्रकरणी आमदारांना नोटीस बजावून आपली मतं मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. पण ती मुदतही उलटून गेली आहे. आम्हाला मुदतवाढ हवी आहे, असे शिंदे गटातील आमदारांची मागणी होती. आता राहूल नार्वेकरांनी याप्रकरणी मोठा निर्णय घेतला आहे. राहूल नार्वेकरांनी एकनाथ शिंदेंच्या ४० आमदारांना दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. पण ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का आहे. राहूल नार्वेकरांनी ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन्ही गटातील आमदारांना नोटीशी बजावल्या होत्या. त्यांना सात दिवसांच्या आत आपले मत मांडायला लावले होते. त्यानुसार ठाकरे गटातील आमदारांनी नोटीशींना उत्तर दिले होते. पण शिंदे गटातील आमदारांनी नोटीशींना उत्तर दिले नाही.
विधीमंडळातील कामकाज सुरु असल्यामुळे आम्हाला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शिंदे गटातील आमदारांनी केली होती. त्यामुळे राहूल नार्वेकरांनी दोन आठवड्यांची मुदतवाढ शिंदेंच्या आमदारांना दिली आहे. नुकतीच विधानसभा अध्यक्ष, सचिव आणि इतर अधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आता १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल आणखी लांबणीवर पडला आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.