जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील दापोरा गावातून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर तालुका पोलिसांनी पकडला. यावेळी ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर सोडून पसार झाला. याप्रकरणी गुरुवार, दि. २७ जुलै रोजी रात्री तालुका पोलिस ठाण्यात ट्रॅक्टरचालक व मालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरापासून नजीक असलेल्या दापोरा गावाच्या नजीक असलेल्या पाण्याच्या टाकीच्या जवळून ट्रॅक्टरमधून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने दि. २७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता कारवाई करत ट्रॅक्टर (एमएच १९, बीजी ८८१४) अडविले. पोलिसांना पाहून ट्रॅक्टरचालक हा ट्रॅक्टर जागेवरच सोडून पसार झाला. पोलिसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात जमा केले. पोलिस कॉन्स्टेबल तुषार जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरवरील अज्ञात चालक आणि मालक या दोघांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल उमेश ठाकूर करीत आहेत.