जळगाव : प्रतिनिधी
आजारी असलेल्या आजी सोबत रात्री बारा पर्यंत थांबलेल्या नातू पुन्हा पहाटे आजीला बघण्यासाठी वडिलांसोबत काकाच्या घरी आला. मात्र घरात प्रवेश करण्यापूर्वीच दारातच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. नातवाच्या मृत्यूनंतर दोन तासांनी आजीची देखील प्राणज्योत मालवली. आजी आणि नातवाची एकत्रच अंत्ययात्रा निघाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात होती. कमलाबाई कोंडू मोरे आणि वैभव विष्णु मोरे अशी मयत आजी-नातवाची नावे आहेत.
फैजपूर शहरात मोरे कुटुंब वास्तव्यास आहेत. मयत कमलाबाई यांना दोन मुलं आहेत. मोठा मुलगा दत्तात्रय यांचे लक्कड पेठ परिसरात डी.के. मोरे ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. दत्तात्रय मोरे आई आणि आपल्या कुटुंबासह लक्कड पेठमध्ये वास्तव्यास आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ विष्णु मोरे आपल्या कुटुंबासह भारंबे वाड्यात राहतात. गेल्या सात ते आठ दिवसापासून कमलाबाई आजारी होत्या. सोमवारी रात्री वैभव हा आजी सोबत रात्री बारापर्यंत होता. मंगळवारी पहाटे कमलाबाई यांची प्रकृती खालावली. यामुळे लहान भाऊ विष्णु यांनी मोठा भाऊ दत्तात्रेय यांना आईच्या तब्येतीबाबत सांगितले.वडील दत्तात्रय व वैभव दोघी काकाच्या घरी आले असता दारात येताच वैभवला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली कोसळला. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नातवाच्या मृत्यूनंतर दोन तासांनी आजीनेही प्राण सोडले. यानंतर दुपारी आजी आणि नातवावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.