मुक्ताईनगर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका ठिकाणी बसचे टायर फुटल्याने बस थेट शेतात जावून धडकली असून या अपघातात जिल्ह्यातील ९ प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. या अपघातात सुदैवाने या अपघातात प्राणहानी टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज जळगाव येथून मुक्ताईनगर आगाराची एमएच २० बीएल-१७७० या क्रमांकाची बस काटेलधामकडे येत असतांना मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा-काकोडा गावाजवळ असलेल्या पारंबी फाट्याजवळ बसचे टायर अचानक फुटले. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस ही बाजूलाच असलेल्या शेताच्या बांधावर जाऊन धडकली. आज सकाळी हा अपघात घडला. या अपघातामध्ये नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. यात प्रतीक्षा सुनील झांबरे ( २२, रा. आळंद ); समाधान उखर्डु तायडे ( ६९, रा. मानेगाव ); कमल गोविंदा पवार ( ५९, रा. वढोदा ); जानकोर त्र्यंबक महाले ( ७५, रा. वढोदा); नलीनी भास्कर न्हावी ( ७०, रा. वढोदा); अनुराधा पाटील ( ३५, मेळसांगवे); कस्तुराबाई भोलणकर ( ७०, रा. शिरसोली); सपना विनोद पाटील ( २७, रा. जामनेर); सार्थक विनोद पाटील (२, रा. जामनेर) यांचा समावेश आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यात कुर्हा येथील शिवसेनेचे शहरप्रमुख पंकज पांडव यांनी तात्काळ अपघातग्रस्तांना स्वत: रूग्णवाहिकेत टाकून स्वत: चालवत उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. या रूग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.