अमळनेर : प्रतिनिधी
५० वर्षीय इसमाने घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला होता आज येथील न्यायालयाने आरोपीला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पारोळा पोलीस स्थानकात दाखल असलेल्या गुन्ह्यात एका आरोपीला आज अमळनेरच्या न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. दिनांक २ ऑगस्ट २०१८ साली देवगाव तालुका पारोळा येथील रहिवासी संतोष मुरलीधर पाटील ( वय ५०) या आरोपीने त्याच्या शेजारी राहत असलेल्या बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला होता. या मुलीस त्याने १० रूपये देऊन कुरकुरे आणण्यासाठी पाठविले. यानंतर त्याने अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. याप्रसंगी ती बालीका त्याच्या हाताला चावा घेऊन पळून गेली. यानंतर तिच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पारोळा पोलीस स्थानकात त्याच्या विरोधात भादंवि कलम ३५४, ३५४ (अ); तसेच पोक्सो कायद्यातील कलम ८ आणि १२ तसेच अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम ३ (डब्ल्यू) (आय) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा खटला अमळनेर न्यायालयात चालला. जिल्हा न्यायाधिश एस. बी. गायधनी यांच्या न्यायालयात खटला चालला. यात विशेष सरकारी वकील किशोर मंगरूळकर यांनी एकूण आठ साक्षीदार तपासले. यात पिडीतेसह पंच, पिडीतेची आजी आणि दुकानदार तसेच तपासी अधिकारी रफीक शेख यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. यामुळे न्यायाधिशांनी कलम ३५४ (अ) अंतर्गत पाच वर्षे शिक्षा; कलम ३५४ (अ) (आय) अंतर्गत तीन वर्षांची शिक्षा व ५०० रूपये दंड; पोक्सो कायद्यातील कलम ८ अंतर्गत ५ वर्षे शिक्षा आणि ५०० रूपये दंड तर ऍट्रॉसिटीच्या कलमांतर्गत ५ वर्षे शिक्षा आणि ५०० रूपये दंड अशा शिक्षा सुनावल्या. या शिक्षा त्याला एकत्रीतपणे भोगायच्या आहेत. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून उदयसिंग साळुंखे, पो. कॉ. हिरालाल पाटील, निती कापडणे, राहूल रणधीर यांनी काम पाहिले.