जळगाव : प्रतिनिधी
कचरा, अमृतचे पाणी आदी समस्यांबाबत महासभेत आवाज उठवूनही त्याची दखल घेतली जात नाही. नगररचना विभागातील भ्रष्टाचार बंद व्हावा व आयुक्तांची बदली करावी यासाठी भाजपचे नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे गुरुवार, दि. २७ जुलैपासून महापालिकेसमोर साखळी उपोषण करणार आहेत. सर्व पक्षीय नगरसेवकांसह जळगावकरांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन सोनवणे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे.
जळगाव शहराला आज समस्यांनी घेरले आहे. चालायला रस्ते नाहीत. पावसाळ्यात सर्वत्र चिखल साचला आहे. रोज २५० टन कचरा संकलनाचा मक्ता दिलेला असताना ३०० टन कचरा संकलित केल्याचे दाखवून महापालिकेची लूट केली जात आहे. इतका कचरा दाखविल्यावरही शहरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. आता त्यातून दुर्गंधी येऊ लागली आहे. नगररचना विभागात दलाल सक्रिय झाले आहेत. पैशांशिवाय फाइल हलत नाही. विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांनीही या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे. सर्व पक्षीय नगरसेवक, भाजप कार्यकर्ते, जळगावकर नागरिक यांनी या उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.