एरंडोल : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात अनेक अल्पवयीन मुली असोसह तरुणीवर अत्यचार होण्याचे प्रमाण सुरु असतांना एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एरंडोल तालुक्यातील एका मुलींच्या वस्तीगृहातील काळजी वाहकाने पाच बालिकांवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तिघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील खडके या ठिकाणी एक मुलींचे वस्तीगृह असून या ठिकाणी गणेश शिवाजी पंडीत हा काळजीवाहक म्हणून नेमणूकीला आहे. काळजीवाहक गणेश पंडीत याने वस्तीगृहातील बालिकांसोबत ऑगस्ट 2022 ते जून 2023 या कालावधीत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार बालिकांनी केली आहे. या पिडीत बालिकांनी या घटनेची माहिती संस्थेचे अधिक्षक आणि सचिव याच्याकडे देखील केली. मात्र त्यांनी या घटनेची माहिती लपवून ठेवल्याची बालिकांची तक्रार आहे. या बालिकांपैकी एक बालिका आदिवासी मागास समाजाची असल्याचे माहिती असतांना देखील हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी वस्तीगृहाचा मुख्य संशयीत आरोपी (काळजीवाहक) तसेच महिला अधिक्षक, सचिव अशा तिघांविरुद्ध एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश शिवाजी पंडीत, अरुणा गणेश पंडीत (अधिक्षक), भिवाजी दिपचंद पाटील (रा. तळई ता. एरंडोल) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. या घटने प्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप विभागीय अधिकारी सुनिल नंदवाळकर करत आहेत.