लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील विनोद धोंडू शिंदे यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे ४ लाख ८३ हजाराचा मुद्देमाल चोरणाऱ्या दोन संशयितांना जळगावातील तांबापुरातून एमआयडीसी पोलीसांनी अटक केली. दोघांना मुक्ताईनगर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबत माहिती अशी की मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील विनोद धोंडू शिंदे हे वरणगाव फॅक्टरीत नोकरीला आहे. आपल्या कुटुंबीयांसह कोथळी येथे वास्तव्याला आहे. विनोद शिंदे यांच्या काकाचे निधन झाल्याने त्यांच्या दशक्रियाविधी कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावून बोईसर नवापूर येथे आई व वडील यांच्यासोबत बाहेरगावी गेले होते. याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोडा तोडून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, टाटा स्काय कंपनीचा सेटटॉप बॉक्स आणि ९० हजार रुपयांची रोकड असा एकूण ४ लाख ८३ हजार १७० रुपयांचा ऐवज लांबविला होता. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेपुर्वी जळगावात ढाकेवाडी येथील ज्वेलर्स दुकान फोडून दागिने चोरीच्या दाखल गुन्ह्यात एमआयडीसी पोलीसांनी संशयित आरोपी मोनुसिंग जगदीशसिं बावरी याला ६ नाव्हेंबर रोजी मुक्ताईनगर शहरातून अटक केली होती. दरम्यान मुक्ताईनगर येथील घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोकड लांबविल्याची कबुली दिली होती. या गुन्ह्यातील त्याचा भाऊ मोहनसिंग जगदीशसिंग बावरी आणि सतविरसिंग बतमतसिंग टाक दोन्ही रा. तांबापूरा यांना सोमवारी ८ नोव्हेंबर रोजी रात्री मेहरूण तलाव परिसरातून अटक केली आहे. दोघांना पुढील कारवाईसाठी मुक्ताईनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.