जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात सहा महिन्यापूर्वीच शनिपेठ पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक पदी वर्णी लागलेल्या शंकर शेळके यांच्या धमाकेदार कामगिरीमुळे त्यांची नियुक्ती अकोला एलसीबी पोलीस निरीक्षकपदी नियुक्तीचे आदेश नुकतेच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी काढले आहेत.
जळगाव जिल्ह्यात पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांची अवघ्या काही दिवसांपूर्वी अकोला जिह्यात बदली झाली होती. त्यानंतर रात्री उशिरा त्यांचे अकोला एलसीबी पोलीस निरीक्षकपदी नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. आज दुपारी ११ वाजेनंतर ते पदभार स्वीकारणार आहेत. पो.नि. शंकर शेळके यांनी आपल्या कारकिर्दीला धरणगाव पोलीस स्थानकापासून सुरुवात केली होती. याठिकाणी त्यांनी पाळधी येथे व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी खून प्रकरणाच्या तपासात महत्वाची भूमिका बजावली होती. या गुन्ह्यातील मास्टरमाईंड पोलीस कर्मचारी होता. त्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासासाठी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी स्वत: न्यायालयात संशयितांच्या पोलीस कोठडीसाठी युक्तीवाद केला होता. अटकेतील संशयितांना ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी म्हणून तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी स्वत: न्यायालयासमोर प्रभावीपणे मुद्दे मांडून तसेच बचावपक्षाचे मुद्दे खोडून काढले होते. तसेच अवघे एक-दीड वर्ष राहूनही धरणगावकरमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले होते.
मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गावर संत मुक्ताबाई साखर कारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळ असणाऱ्या पुलाच्या खालील बाजूस २९ ऑगस्ट २०२२ रोजी फेकलेल्या एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. विशेष म्हणजे मारेकरी, मयत महिला, खून झाल्याचे घटनास्थळ हे सर्व मुक्ताईनगर बाहेरील असल्यानंतरही पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी या खुनाचा उलगडा केला होता. पो.नि.शेळके यांनी क्षणाचाही विलंब न करता, संशयिताला ताब्यात घेतले होते. विशेष म्हणजे पोलीस चौकशी करत असल्यामुळे तो पळून जाण्याच्या बेतात होता. पण पो.नि.शेळके यांनी तत्पूर्वीच त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.
जळगाव शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जून २०२३ मध्ये भरदिवसा मोठा दरोडा पडला होता. परंतू या गुन्ह्यात अवघ्या ४८ तासात गुन्ह्याची उकल करत तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपींकडून ३ कोटी ६० लाखांचे सोने आणि १६ लाख ४० हजारांची रोकडसह संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला होता. यासारख्या अनेक गुन्ह्याच्या तपासातही पो.नि. शंकर शेळके यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, आता त्यांच्याकडे अकोला गुन्हे शाखेचा पदभार आल्यामुळे त्यांच्याकडून अशीच कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.