नाशिक : वृत्तसंस्था
महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे नुकतेच उत्तर महाराष्ट्राचा दौरा आटोपून मुंबईच्या दिशेने निघाले असतांना नाशिक जवळील एका टोल नाक्यावर त्यांचा ताफा थांबवल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी समृद्धी टोल प्रशासनाच्या वतीनं वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
ही तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत 15 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. यातील 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या तोडफोडीमध्ये जवळपास पाच लाखांचं नुकसान झाल्याचा दावा समृद्धी टोल प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला आहे. अमित ठाकरे आणि मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी 22 जुलै रोजी संध्याकाळी अहमदनगरहून सिन्नरकडे समृद्धी महामार्गाहून येत होते. यावेळी सिन्नर येथील समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर अमित ठाकरेंचा ताफा अडवण्यात आला. त्यांना आर्धा तास थांबवलं गेलं. ओळख सांगूनही संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली, असा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून टोल नाक्याची तोडफोड करण्यात आल्यानंतर अमित ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांनी उद्धट भाषा वापरली. फास्ट टॅग असूनही बराचवेळ गाडी थांबवण्यात आली, टोकनाक्यावर काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. मात्र मॅनेजरसह कर्मचारी उद्धट भाषेत बोलले असा दावा अमित ठाकरे यांच्याकडून करण्यात आला होता.