लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आकाशवाणी चौक परिसरातील दोन ठिकाणी चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील सोन्याची अंगठी आणि रोकड असा एकुण दीड लाख रूपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, प्रसाद यशवंत काळे (वय-४७) रा. आसोदा ता. जि.जळगाव ह.मु. गणेश नगर, आकाशवाणीच्या मागे जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते जैन कंपनीत नोकरीला आहे. दिवाळीनिमित्त घरातील सदस्य गावाला गेले होते. प्रसाद काळे यांची कंपनीत रात्रपाळी असल्याने ते ७ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता घराला कुलूप लावून कामाला निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील सोन्याची अंगठी आणि रोकड असा एकुण ७० हजाराच्या मुद्देमालाची चोरी केली. हा प्रकार ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आला. त्यानंतर त्यांच्या गल्लीत राहणारे सुभाष अरूण पाटील यांचे देखील बंद घरफोडून घरातील८० हजार रूपयांचे दागिने लांबविल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी प्रसाद काळे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहे.