मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात जोरदार पाऊस गेल्या आठ दिवसापासून अनेक भागात सुरु आहे. याच वेळेत जालन्यामधून एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. शेळ्या चारायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील तळेगाव येथील तलावामध्ये घडली आहे. अभिजीत भारत येडे (वय 17) अर्चना संजय भालेराव (वय 15) दोघे रा.तळेगाव अशी पाण्यात बुडून मृत पावलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.
अभिजीत येडे आणि अर्चना भालेराव हे दोघे गुरूवारी सकाळी शेळ्या चारण्यासाठी शेळ्या घेऊन घरून गेलेले होते. नेहमीप्रमाणे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांच्या शेळ्याच घरी आल्या परंतु दोघेही घरी परतले नाही. घरच्यांनी थोडावेळ वाट पहिली पण मुले घरी न परतल्याने घरच्यांसह नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. ज्या भागात मुले शेळ्या चरण्यासाठी घेऊन जातात तिथल्या आजूबाजूच्या शेतकर्यांना विचारपूस केली.मात्र त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही.
रात्री शोध घेता घेता रात्री 8 च्या सुमारास तळेगाव येथील तलावात अभिजीत येडे याच्या चपला तरंगतांना दिसल्या. सोबतच त्याच ठिकाणी पाणी पिण्याची बाटली पण दिसून आल्याने काहीतरी अघटीत घडल्याची कल्पना गावकऱ्यांना आली. यानंतर त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. रात्रभर दोघांचा शोध सुरू होता. पण काहीच सुगावा लागला नाही. अखेर (Jalna News) काल सकाळी नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी तलावात गळ टाकून पाहिला असता अभिजीत येडे आणि अर्चना भालेराव यांचे मृतदेह बाहेर आले. यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राणी उंचेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. शवविच्छेदन केल्यानंतर दोन्ही मयातांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.