मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्रीपदी अजित पवार यांना कंटाळून शिवसेनेच्या ठाकरे गटातून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड करून भाजप सोबत घरोबा करून राज्यात सत्ता स्थापन केली होती. पण वर्षभरात राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार आपल्या आमदारासोबत येवून शिंदे व फडणवीस सरकारमध्ये अर्थमंत्री झाल्यामुळे अनेकांची गोची झाली आहे. व त्याचा परिणाम देखील जाणवू लागला आहे. अजित पवार यांनी आपल्यासोबत आलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांवर निधीची खैरात केली आहे. मात्र, या तुलनेत शिंदे गटाच्या आमदारांना मात्र कमी निधी देण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीदेखील आज पत्रकार परिषदेत या निधीवाटपावर भाष्य केले आहे. संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे फक्त आपल्या गटाच्या आमदारांनाच निधी देतात. देवेंद्र फडणवीस भाजप आमदारांना निधी देतात. आता अजित पवारही केवळ आपल्यासोबत आलेल्या आमदारांवर निधीची खैरात करत आहेत. मग, इतर पक्षाच्या आमदारांनी काय करायचे? त्यांनी आपल्या मतदारसंघात विकासकामे करायची नाहीत का? त्यांनी विकासाचे कोणतेही स्वप्न पाहायचे नाही का? हे धोरण राज्यासाठी अतिशय घातक आहे, असे संजय राऊत म्हणाले.