उमवित देणार नाट्यशास्त्र अभ्यासाचे धडे !
खान्देशातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू झाला असून प्रवेशासंबंधी नुकतीच जाहिरात निघाली. दरम्यान, मार्च २०२१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. कुणाल पवार यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्यात यावे, अशी मागणी प्रभारी कुलगुरू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
कुणाल पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, नाट्यशास्त्र विभाग सुरू व्हावे, यासाठी कलावंतांनी बऱ्याच वेळा तत्कालीन कुलगुरूंची भेट घेऊन पाठपुरावा केला. अर्जसुद्धा करण्यात आले. त्यावर कुलगुरूंनी निधीचे कारण पुढे करून नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्यात येऊ शकत नाही, असे सांगून त्याबाबत असमर्थता दाखवली होती. परिणामी, कलावंत विद्यार्थी बाहेर जिल्ह्यात शिक्षणासाठी स्थलांतर होतात. त्यामुळे नवीन कलावंत हा जळगावातील विद्यापीठामध्ये तयार व्हावा म्हणून विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्यात यावा.
दरम्यान, यानंतर कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली दि. २ जून रोजी विद्या परिषदेच्या झालेल्या बैठकीत विद्यापीठात नाट्यशास्त्र विषय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली होती. दरम्यान, नाट्यशास्त्र विभाग सुरु केल्याबद्दल ॲड. कुणाल पवार यांनी विद्यापीठ प्रशासनासह कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांचे आभार मानले आहेत.