पुणे : वृत्तसंस्था
पुणेपोलिसांनी मोठी कारवाई करत NIA कडून वॉन्टेड घोषित करण्यात आलेल्या 2 कुख्यात दहशतवादयांना जेरबंद केले. मागील दीड वर्षांपासून ते फरार होते. दोघांवरही NIA ने पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पुण्याच्या कोथरूड भागातून दोघांनाही अटक करण्यात आली. गस्तीवर असणाऱ्या कोथरूड पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी संशयातून दोघांना पकडले आणि चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोहमद ईनुस साखी व इम्रान खान अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पुणे पोलिसांच्या या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कोथरूड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कुलकर्णी, पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन गस्तीवर असताना त्यांनी या दोघांना दुचाकी चोरीच्या संशयातून हटकले. मात्र, त्यांची हालचाल ही संशयास्पद दिसली. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत आणखी पोलिसांना बोलावून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता कोंढवा परिसरातील त्यांच्या राहत्या घरातून एक लॅपटॉप, चार मोबाईल तसेच बनावट आधार कार्ड मिळाले. त्यावरून त्यांच्याकडे सखोल चौकशी सुरू करण्यात आली. यादरम्यान चौकशीत काही संशयास्पद माहिती मिळाली. त्यानंतर पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पुणे पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकाने दिवसभर या दोघांकडे चौकशी केल्यानंतर ते NIA कडून फरार असलेले दहशतवादी असल्याचे समोर आले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यांच्याकडून जप्त केलेला मोबाईल, लॅपटॉप यांची तपासणी सुरू केली आहे. तर इतर तपास यंत्रणा देखील पुण्यात दाखल झाल्या आहेत. राजस्थान चितोडगड याठिकाणी NIA एक कारवाई केली होती. तेव्हा काही स्फोटक पकडले गेले होते. त्या गुन्ह्यात हे फरार आहेत. NIA कडून या आरोपीवर 5 लाखांचे बक्षीस जाहीर होते.