छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील शेतकऱ्याला कल्पनाही नसताना, त्याच्या शेतात विहीर खोदली गेली. तीन लाख रुपये शासकीय अनुदानसुद्धा परस्पर उचलले. हा सर्व प्रकार चार वर्षांपूर्वी झाल्याची शासकीय दप्तरातील नोंद पाहून त्याला धक्काच बसला. यानंतर सातत्याने पाठपुरावा करूनही कारवाई झाली नाही, म्हणून त्याने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मुभा देत या शेतकऱ्याची याचिका न्यायालयाने निकाली काढली.
साहेबराव सखाहरी जाधव हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील शेलगाव गंजी येथील शेतकरी आहेत. त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत परस्पर २ लाख ९९ हजार रुपये अनुदान मंजूर करून घेतले गेले. बनावट कागदपत्रे आणि स्वाक्षरी करून २०१६ सालीच अनुदानही उचलले गेले. चार वर्षांनंतर २०२० ला साहेबरावच्या गोंधळ झाल्याचे त्यांना निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी केजचे गटविकास अधिकारी यांना ४ ऑगस्ट २०२२ ला आणि बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना २६ सप्टेंबर २०२२ रोजी निवेदन दिले. मात्र, त्यांनी दखल घेतली नाही. म्हणून औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती