लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील कंजरवाडा परिसरातील एका दुकानाचे कुलूप तोडून दुकानातून अडीच लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी घडली होती. याप्रकरणी जळगाव येथील साथीदारांच्या सहाय्याने घरफोडी करणाऱ्या चोरट्यास मध्यप्रदेशातून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. भारतसिंग आयासिंग भाटिया (वय-१९) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
जळगाव शहरातील संत चोखामेळा वस्तीगृहामागील नंदुरबारकर सराफ या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी घडली होती. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय हिवरकर यांना या गुन्ह्यातील संशयित आरोपी भारतसिंग भाटिया हा मध्यप्रदेशातील सतवास येथे असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. दरम्यान, पोहेकॉ. संजय हिवरकर यांनी याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय हिवरकर, राजेश मेढे, पोलीस नाईक संतोष मायकल, चालक मुरलीधर बारी या पथकाला मध्यप्रदेशातील सतवास येथे रवाना केले. पथक सतवास येथे पोहोचल्यानंतर पथकाने सतवास पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने सापळा रचून संशयित भारतसिंग आयासिंग भाटिया (वय-१९, रा. यात्रा मैदान, आत्माराम बाबा पाण्याच्या टाकीजवळ, सतवास, जि. देवास, मध्यप्रदेश) यास ताब्यात घेतले.
साथीदारांच्या मदतीने केली चोरी भारतसिंग भाटिया याला जळगावात आणल्यानंतर त्याने जळगावातील मोनुसिंग जगदीशसिंग बावरी व अन्य एका साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केल्यानंतर मोनुसिंग बावरी याच्या घरी जाऊन दागिन्यांचे समान हिस्से करून वाटप करून घेतल्याचे व त्याच्या हिस्स्यावर आलेले दागिने सतवास येथे लपवून ठेवल्याची कबुलीही त्याने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, भारतसिंग हा मध्यप्रदेशातील हिस्ट्रीशिटर गुन्हेगार आयासिंग भाटिया याचा मुलगा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.