यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील कोळवद शिवारात बैलगाडीला विद्युत तारांचा धक्का लागल्याने बैलजोडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर बैलगाडीतील सहा 1 जणांचा जीव वाचल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कोळवद येथील शेतकरी सुनील अशोक चौधरी मंगळवारी शेतमजुरांसोबत बैलगाडी घेऊन कामाला गेले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास शेतातील पेरणीचे काम आटोपून परत येत असताना रस्त्यावर वीज खांबांच्या तणावासाठी लावलेली चिनीप्लेट तुटली होती. यात विद्युत प्रवाह उतरला होता. यास बैलगाडीचा स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. प्रसंगावधान राखत सर्वांनी तत्काळ बैलगाडीतून उड्या घेतल्याने त्यांचा जीव वाचला. एक लाख रुपये किमतीची ही बैलजोडी होती. शासनाकडून शेतकऱ्याला तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.